अकोला : अकोला शहराची लाइफलाइन काटेपूर्णा धरणात केवळ १.८० टक्केच जिवंत जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा काही दिवसांपुरता उरल्याने अकोलेकरांचे डोळे नभाकडे लागले आहेत.वाण धरण सोडले, तर जिल्ह्यातील धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. काटेपूर्णा धरणात तर रविवार, ३ जून रोजी १.८० टक्केच जलसाठा शिल्लक होता. यात अर्धा गाळ आहे. त्यामुळेच सर्वत्र पावसाची प्रतीक्षा आहे; अन्यथा अकोला शहरावरील पाणीटंचाईचे संकट वाढणार आहे. महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावात दहा दिवसांनंतर ग्रामपंचायतने बांधलेल्या छोट्या पाण्याच्या टाकीतून केवळ दीड ते दोन मीटर पाणी सोडले जात आहे. गुडधी गाव हे त्याचे एक उदाहरण आहे. या गावाला १० ते १५ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात असून, १५ ते २० मिनिटच पाणी मिळत असल्याने या गावातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील निर्गुणा व मूर्तिजापूर तालुक्यातील उमा या मध्यम स्वरू पाच्या धरणामध्ये शून्य साठा असून, पातूर तालुक्यातीलच मोर्णा धरणात केवळ ६.३७ टक्के जलसाठा शिल्लक असून, मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी बॅरेजमध्ये ११.२९ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. तेल्हारा तालुक्यातील वाण धरणात सध्या ६२.९७ टक्के बऱ्यापैकी जलसाठा शिल्लक आहे. दरम्यान, जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पावसाला सुरुवात झाली. तरी जुलै, आॅगस्टच्या पावसाच्या जोरावर धरणे भरायला सप्टेंबर उजाडावा लागणार आहे. त्यामुळे मृत जलसाठा उपसावा लागणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठीची तयारी महापालिका प्रशासनाने केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
१.८० टक्के पाणी उरले असले, तरी काटेपूर्णा धरणात ११.३२ दलघमी मृतजलसाठा आहे. त्यात ६.३२ दलघमीवर गाळ आहे. जिवंत जलसाठा संपला, तरी उर्वरित मृत साठा वापरात येईल. तोपर्यंत पाऊस येण्याची शक्यता आहे. पण, पाण्याचे आता काटेकोर नियोजन व वापर करणे गरजेचे आहे.जयंत शिंदे,कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग,अकोला.