अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा, हिवरखेड, अकोट तसेच बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, सोनाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी बेड्या ठोकल्या. या दोन चोरट्यांकडून चोरलेल्या तब्बल १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या चोरट्यांना पुढील तपासासाठी हिवरखेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
हिवरखेड येथील रहिवासी अमर उर्फ समाधान बाळकृष्ण शिरसाठ (वय २३ वर्ष) आणि गणेश महादेव धर्म (वय २२ वर्ष) यांनी तेल्हारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरल्याची माहिती मिळाली होती. यावरून त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनातील पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या दोन्ही चोरट्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अकोट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ते पाच दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्यानंतर तेल्हारा, अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यासोबतच बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरल्या असून, जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुचाकी चोरल्या. दोन्ही चोरट्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून चोरीच्या १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. हा मुद्देमाल चार लाख रुपयांचा असल्याची माहिती आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, सहायक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, जयंत सोनटक्के, अश्विन कुमार मिष्रा, गोकुळ चव्हाण, शक्ती कांबळे, किशोर सोनवणे, वसीम शेख, प्रवीण कश्यप, अनिल राठोड, रोशन पटले, सतीश गुप्ता, सुशील खंडारे यांनी ही कारवाई केली.