अकोला : महापालिकेत येत्या १८ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून, सभेमध्ये तब्बल १९ विषयांचा समावेश करण्यात आला आहे. सभेमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या जागेमधील खड्डा बुजविण्याच्या विषयावर विरोधी पक्ष कोणती भूमिका घेतात याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या मुख्य सभागृहात १९ फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा केली जाणार असून, विषय सूचीमध्ये तब्बल १९ विषयांचा समावेश करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेमधील पात्र लाभार्थ्यांची घरे गुंठेवारी जमिनीवर मंजूर करण्यात आली आहेत. या गुंठेवारीला नियमानुकूल करण्याचा निर्णय मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्या आनुषंगाने गुंठेवारी जमिनीवरील लाभार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे. याव्यतिरिक्त शहरालगतच्या भोड येथील जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारल्या जाणार असून, या ठिकाणी खदान असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. ही बाब प्रकल्प अहवाल तयार करताना का नमूद करण्यात आली नाही तसेच प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या निविदेमध्येही या खदानचा उल्लेख नसल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या प्रस्तावावर मागील सभेत चर्चा करण्यात आली असता ''डीपीआर'' मध्ये व मनपाने मंजूर केलेल्या निविदेत तांत्रिक त्रुटी असल्याचा आक्षेप शिवसेना व काँग्रेसमधील नगरसेवकांनी घेतला होता. विरोधकांचा आक्षेप लक्षात घेता खड्डा बुजविण्याचा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला होता. या विषयावरून सभागृहात कोणता निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागून आहे.
आयुक्त निमा अरोरा प्रदीर्घ रजेवर
महापालिका आयुक्त निमा अरोरा येत्या १९ फेब्रुवारीपासून प्रदीर्घ रजेवर जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनपाच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांचा समावेश करण्यात आल्याचे बोलले जात आहे.