- नितीन गव्हाळेअकोला: वैज्ञानिक व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शाळांमधील शिक्षकसुद्धा सक्षम व्हावेत, स्पर्धेची तयारी करून घेताना शिक्षकांना तंत्रज्ञान अवगत व्हावे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने राज्यातील शिक्षकांना तंत्रस्नेही (टेक्नोसॅव्ही) बनविण्याच्या दृष्टिकोनातून विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. राज्यातील १९ हजार ४३४ शिक्षकांना तंत्रस्नेही प्रशिक्षण देण्यात येत आहे.सध्याची पिढी हुशार आणि टेक्नोसॅव्ही आहे आणि शाळांमधील विद्यार्थी स्पर्धेत टिकावेत, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना सक्षम करण्यासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व व्यावसायिक विकास संस्थेंतर्गत माहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने शिक्षक तंत्रस्नेही प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. अकोल्यात जिल्हास्तरीय तंत्रस्नेही प्रशिक्षण १७ व १८ फेब्रुवारी रोजी पार पडले. सर्वच जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. या दोन दिवसांच्या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना कनेक्टिंग डिवाइसेस, मोबाइल लर्निंग टुल, गुगल प्रॉडक्ट्स-सर्व्हिसेस, एमएस आॅफिस, फिल्ड ट्रीप, सायबर सुरक्षा, आॅडिओ, व्हिडिओ क्रियेशन, आॅनलाइन युटिलिटीज यासह इतर विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. तंत्रज्ञानाचा वर्ग अध्ययन अध्यापनात वापर करून अध्ययन अध्यापन प्रक्रिया कशी सुलभ करता येईल, याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे, तसेच फिल्ड ट्रीप अंतर्गत आॅस्ट्रेलिया येथील शाळा व जीवनशैलीबाबत माहिती देण्यात येत आहे. तंत्रस्नेही प्रशिक्षणाचा उपक्रम राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, ‘एमएससीईआरटी’ पुणेचे संचालक डॉ. सुनील मगर, आयटीचे विभाग प्रमुख विकास गरड, जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव, विभाग प्रमुख डॉ. विकास गावंडे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातील ५0 प्राथमिक शिक्षक आणि प्रत्येक जिल्ह्यातून माध्यमिकचे ४४ शिक्षकांची निवड करण्यात येते. यातही डिजिटल शाळांमधील शिक्षकांना प्राधान्य देण्यात येते.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत पालक सजग आहेत. शाळेत शिकविताना शिक्षकसुद्धा टेक्नोसॅव्ही झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांना शिकविताना त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी राज्यभरात हा उपक्रम राबविला आहे. जिल्ह्यात ३९४ शिक्षकांना तंत्रस्नेही प्रशिक्षण देण्यात आले.-डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य,जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व व्यावसायिक विकास संस्था
तंत्रस्नेही कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत मॉड्युल प्रशिक्षणाचा उपयोग गुणवत्तेसाठी करून शिक्षकांना वर्ग अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.-दिनेश बोधनकर, विषय सहायकमाहिती व तंत्रज्ञान.