संतोष येलकर....................अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांपाठोपाठ आता घरकाम करणाऱ्या जिल्ह्यातील नोंदणीकृत १९ हजार मोलकरणींनाही आता प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांच्या मदतीचा आधार मिळणार आहे. अर्थसाहाय्याची रक्कम मोलकरणींच्या थेट ॉबँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी राज्यात गत १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे रोजगार बंद पडल्याच्या पार्श्वभूमीवर बांधकाम मजूर, कामगारांसह घरकाम करणाऱ्या मोलकरणींसाठी प्रत्येकी १ हजार ५०० रुपये याप्रमाणे अर्थसाहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याअनुषंगाने ३० एप्रिल रोजीच्या उद्योग, ऊर्जा कामगार विभागाच्या निर्णयानुसार बांधकाम कामगारांसह आता घरकाम करणाऱ्या मोलकरणींना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये याप्रमाणे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने २०११ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील घरकाम करणाऱ्या १९ हजार माेलकरणींना प्रत्येकी १ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे. मदतीची रक्कम लवकरच मोलकरणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाकाळात घरकाम करणाऱ्या जिल्ह्यातील मोलकरणींना प्रत्येकी दीड हजार रुपयांच्या मदतीचा आधार मिळणार आहे.
‘ही’ कागदपत्रे सादर करावी लागणार!
कोरोनाकाळात मिळणाऱ्या प्रत्येकी दीड हजार रुपये मदतीसाठी जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या घरकाम करणाऱ्या मोलकरणींनी बँकेचे पासबुक, नोंदणीपावती, जन्मतारखेची पावती इत्यादी कागदपत्रे ‘ई-मेल’व्दारे सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती सहायक कामगार आयुक्त राजू गुल्हाने यांनी दिली.
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत २०११ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील घरकाम करणाऱ्या १९ हजार मोलकरणींना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये याप्रमाणे अर्थसाहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यातील घरकाम करणाऱ्या मोलकरणींच्या बँक खात्यात अर्थसाहाय्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
राजू गुन्हाने
सहायक कामगार आयुक्त, अकोला
कोरोनाकाळात काम, धंदे बंद पडले असून, शासनाकडून घरकाम करणाऱ्या मोलकरणींना प्रत्येकी दीड हजार रुपये मदतीचा आधार होणार आहे; मात्र कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागविण्यासाठी प्रत्येकी दीड हजार रुपयांची मिळणारी मदत अत्यल्प ठरत असून, घरकाम करणाऱ्या मोलकरणींना प्रत्येकी किमान पाच हजार रुपयांची मदत मिळायला पाहिजे होती.
कल्पना शैलेश सूर्यवंशी
जिल्हाध्यक्ष, मोलकरीण संघ, अकोला