अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त पूर्वपरीक्षा रविवार, ३० एप्रिल रोजी घेण्यात आली. अकोला शहरातील ४१ उपकेंद्रांमध्ये घेण्यात आलेल्या या परिक्षेत ९ हजार ६१ उमेदवारांनी परीक्षा दिली असून, उर्वरित १ हजार ९२२ उमेदवार परिक्षेला गैरहजर होते.
अकोला शहरातील ४१ उपकेंद्रांमध्ये सकाळी ११ ते १२ या वेळेत ‘एमपीएससी’ची परीक्षा घेण्यात आली. या परिक्षेसाठी जिल्हयातील एकूण १० हजार ९८३ उमेदवार प्रविष्ट होते. त्यापैकी ९ हजार ६१ उमेदवारांनी परीक्षा केंद्रांमध्ये उपस्थित राहून परीक्षा दिली. उर्वरित १ हजार ९२२ उमेदवार मात्र परिक्षेला गैरहजर होते. या परिक्षेसाठी ४१ केंद्रप्रमुखांसह ५४० समवेक्षक, १६६ पर्यवेक्षक व ११ समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा नियंत्रक म्हणून गजानन सुरंजे यांनी शहरातील काही परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. परीक्षा कालावधीत पोलीस विभागामार्फत परीक्षा केंद्रांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच परीक्षेच्या कालावधीत गैरप्रकार होऊ नये व परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले होते. शहरातील संबंधित परीक्षा केंद्रांमध्ये घेण्यात आलेली ‘एमपीएससी’ची परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पडली.