अकोला: ‘डिजीटल इंडिया लॅन्ड रेकाॅर्ड मार्डनायझेशन’ कार्यक्रमांतर्गत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटाॅप खरेदीसाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १९६ तलाठ्यांना नवा लॅपटाॅप मिळणार असून, नवीन लॅपटापची खरेदी लवकरच करण्यात येणार आहे.
‘डिजीटल इंडिया लॅन्ड रेकाॅर्ड माॅर्डनायझेशन’ कार्यक्रम अंतर्गत राज्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या लॅपटाॅपची क्लाऊड सर्व्हरसोबत जोडणी करण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटाॅप खरेदीकरिता शासनामार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर , बार्शिटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील १९६ तलाठ्यांना नवा लॅपटाॅप मिळणार आहे. जिल्ह्यात ५३ महसूल मंडळ अधिकारी व ३२२ तलाठी असून, त्यापैकी ज्या महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या लॅपटाॅपला पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला आहे आणि लॅपटाॅप कालबाह्य व नादुरुस्त झाले आहेत, अशा जिल्ह्यातील १९६ तलाठ्यांना नवा लॅपटाॅप मिळणार आहे. त्यासाठी नवीन लॅपटाॅपची खरेदी लवकरच करण्यात येणार आहे.
एकूण तलाठी
३२२
नवे लॅपटाॅप मिळणारे तलाठी
१९६
एकूण मंडळ अधिकारी
५३
पूर्वीचे लॅपटाॅप झाले
कालबाह्य, नादुरुस्त!
‘इ महाभूमी अंतर्गत ई-फेरफार’ आज्ञावलीच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या लॅपटाॅपची क्लाऊड सर्व्हरसाेबत जोडणी करण्याकरिता यापूर्वीही लॅपटाॅप देण्यात आले होते. त्यापैकी जिल्ह्यातील १९६ तलाठ्यांचे लॅपटाॅप कालबाह्य व नादुरुस्त झाले. त्यामुळे संबंधित तलाठ्यांना आता मागणीनुसार नवे लॅपटाॅप देण्यात येणार आहेत.
यापूर्वी २०१४ मिळालेला लॅपटाॅप नादुरुस्त आणि कालबाह्य झाल्याने काम करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे वेळेवर आणि जलदगतीने कामकाज करण्यासाठी नवीन लॅपटाॅप मिळण्याची नितांत गरज आहे.
उज्जवल मानकीकर
तलाठी, अकोली खुर्द
जिल्ह्यात ज्या तलाठ्यांचे लॅपटाॅप नादुरुस्त व कालबाह्य झाले आहेत, अशा १९६ तलाठ्यांना शासनामार्फत प्राप्त निधीतून नवीन लॅपटाॅप उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी