लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मध्यवर्ती बसस्थानकातील दोन व्यक्तिंकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांनाही ताब्यात घेत, त्यांच्याकडील सुमारे १९ लाख ७९ हजार २४० रुपयांची रक्कम रविवारी जप्त केली. या रकमेचे विवरण पोलिसांनी मागितले असता, दोघांनीही विवरण देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे पोलिसांनी ही रक्कम सध्या सिव्हील लाईन्स पोलिसांच्या ताब्यात दिली आहे.
कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील रहिवासी बसवराज मलापा पल्लड आणि महंमद हमीद महंमद मेहबूब हे मध्यवर्ती बसस्थानकावर संशयास्पदरित्या वावरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांना मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडील एका बॅगेतून १९ लाख ७९ हजार २४० रुपयांची रक्कम जप्त केली. या संदर्भात त्यांना विचारणा केली असता, ही रक्कम अकोला येथील व्यापारी आशीर्वाद ट्रेडर्स यांची असल्याची माहिती दोघांनी दिली. ही रक्कम कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील उमर इंडस्ट्रीजचे संचालक यांच्याकडे पोहोचविण्यासाठी दिली होती, असे सांगितले. त्यामुळे हे दोघेही १९ लाख ७९ हजार रुपयांची रक्कम घेऊन कर्नाटकाकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करून यांना ताब्यात घेतले. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातील उमर इंडस्ट्रीजच्या संचालकांशी संपर्क साधला असता, या रकमेचे दस्तावेज घेऊन ते अकोल्याकडे रवाना झाले आहेत. सोमवारी दुपारी या रकमेचे दस्तावेज ते पोलिसांकडे सादर करणार असल्याची माहिती आहे.
शोध चोरट्यांचा मिळाले दुसरेच
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका चोरीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यामधील एक चोरटा सावळ्या रंगाचा असून, तो मध्यवर्ती बसस्थानकावर असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावरून या चोरट्याच्या शोधासाठी पथक बसस्थानकावर गेले असता, १९ लाखांची रक्कम जवळ बाळगलेल्या या दोघांमधील एक युवकही सावळ्या रंगाचा असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याची विचारपूस केली. यावेळी त्याच्याकडील बॅगेत असलेली रक्कम तपासली असता, हा चोरटा नसल्याचे समोर आले. मात्र, रकमेचे विवरण मागितल्यानंतर दोघांनीही असमर्थता दर्शविल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावरून पोलीस चोरट्याच्या शोधात असताना त्यांना भलीमोठी रक्कम घेऊन जाणारे हे दोघे हाती लागले.