अकोला : विधानसभा निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यासाठी २ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, उपलब्ध निधीमधून दीड कोटींचा निधी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांसाठी वाटप करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रशासनामार्फत विविध प्रकारची कामे केली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने स्टेशनरी खरेदी, वाहन भाडे, वाहनांसाठी लागणारे डिझेल, पेट्रोल, छपाई व इतर प्रकारच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाला दोन कोटींचा निधी प्राप्त झाला. उपलब्ध झालेल्या निधीमधून जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघांचा निवडणूक खर्च भागविण्यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे प्रत्येकी ३0 लाख रुपयांप्रमाणे पाचही मतदारसंघात एकूण दीड कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आला. तर उवरित ५0 लाखांचा निधी जिल्हा मुख्यालयी निवडणूक कामासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. उपलब्ध झालेल्या निधीमधून जिल्हा निवडणूक विभागासह पाचही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीचा खर्च भागविला जात आहे. खर्चासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून आणखी निधी उपलब्ध होणार आहे.
निवडणूक खर्चासाठी २ कोटी
By admin | Published: September 22, 2014 1:19 AM