नासीर शेख
खेट्री: पातूर तालुक्यातील पिंपळखुटा येथे गेल्या काही दिवसांपासून शेळ्यांवर अज्ञात आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याकडे पशू उपचार केंद्राचे दुर्लक्ष होत आहे. पशुंना वेळेवर उपचार मिळत नसल्याने, गेल्या पाच दिवसांत १२ पिल्लांसह दोन शेळ्यांचा अज्ञात आजारामुळे मृत्यू झाला असून, अद्यापही १३ शेळ्या गंभीर असल्याचे चित्र आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने, पशुपालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
पिंपळखुटा येथील पशुपालक विष्णू भगवान लाऊळकार यांचे शेळ्यांचे आठ पिल्ले, एक शेळी दगावली असून, चार शेळ्या गंभीर आहे. कपील सहदेव दांदळे यांचे शेळ्याचे चार पिल्ले दगावले असून, नऊ शेळ्या गंभीर आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पशू उपचार केंद्रातील औषधांचा गैरवापर होत असून, पशुपालकांना औषधांचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करून उपचार करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप पशुपालकांकडून होत आहे. पशू पर्यवेक्षक आठवड्यात दोन ते तीन वेळा येऊन तास किंवा अर्धा तास थांबून निघून जातात. त्यामुळे पशू उपचार केंद्राचा कारभार ढेपाळल्याचा आरोप पशुपालकांकडून होत आहे. पशुपालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप पशुपालकांकडून होत आहे. याकडे संबंधित वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. संबंधित वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.
-----------------------------
पशुपालकांमध्ये संतापाची लाट
शेळ्यांवर वेळेवर उपचार होत नसल्याने, तसेच औषधांचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करून, पशुंवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्यामुळे पशुपालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, संतप्त झालेल्या पशुपालकांनी मंगळवारी सकाळी गंभीर असलेल्या शेळ्या उपचार केंद्राच्या आवारात सोडल्याचा प्रकार समोर आला आहे.
--------------------------
पशुंवर वेळेवर उपचार केले जातात, तसेच मंगळवारीही काही पशुंवर उपचार केले, औषधांचा तुटवडा नाही, गंभीर शेळ्यावर उपचार करण्यात येईल, तसेच लसीचेही आयोजन करण्यात येणार आहे.
- पुरुषोत्तम देशमुख, पशू पर्यवेक्षक, पिंपळखुटा.
-------------
औषधांचा तुटवडा असल्याचे कारण पुढे करून वेळेवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्यामुळे, तसेच पशू पर्यवेक्षकाच्या हेकेखोरपणामुळे माझी शेळीचीआठ पिल्ले व एक शेळी असे ९ पशू दगावले असून, चार शेळ्या अजूनही गंभीर आहेत.
-विष्णू भगवान लाऊळकार, पशुपालक पिंपळखुटा.
------------------------
पशू उपचार केंद्रातील औषधांचा गैरवापर होत आहे. खासगी डॉक्टर उपचार केंद्रातील औषध घेऊन आमच्या पशुंवर उपचार करून आर्थिक लूट करीत आहेत. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी दखल घ्यावी.
- कपील सहदेव दांदळे, पशुपालक पिंपळखुटा.
140921\img-20210914-wa0181_1.jpg
फोटो