लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी : तालुक्यातील पिंपळखुटा येथील साई स्टोन इंडस्ट्रिज येथून गौण खनिजाची नियमानुसार वाहतूक न केल्याच्या कारणावरून मूर्तिजापूरच्या उप विभागीय अधिका-यांनी अकोला येथील राजराजेश्वर कन्स्ट्रक्शन तथा अकोल्याचेच पी.पी. देशमुख यांना सोमवारी २ लाख ३१ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. उप विभागीय अधिकारी भागवत सैदाने हे १९ एप्रिल रोजी शासकीय दौ-यावर असताना त्यांना दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कान्हेरी सरप शिवारात अकोल्याच्या सिंधी कॅम्प भागातील रहिवासी वाहन चालक भगवान नारायण पाईकराव हा वाहन एम.एच. ३१ एम ४६६० क्रमांकाच्या वाहनातून गौण खनिजात समावेश असलेल्या तीन ब्रास मुरुमाची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी सदर वाहनाची पडताळणी केली असता वाहन चालकाने दाखविलेल्या पास क्र. ११६२२४ वर गौण खनिजाचा प्रकार नमूद केलेला नव्हता व पास क्र. ११६२२३, ११६२२५ वर गौण खनिजाचा प्रकार नमूद केला असला, तरी त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आढळून आला नाही. तसेच सदर दोन्ही पासवर गौण खनिजाचा प्रकार ‘मेटल’ असल्याचे नमूद केले होते. परंतु, प्रत्यक्षात तपासणी करीत असताना गैर अर्जदाराच्या वाहनात मुरूम असल्याचे आढळून आले. वाहनचालक भगवान नारायण पाईकराव यांनी दिलेल्या बयानात सदर तीन ब्रास मुरुम साई स्टोन इंडस्ट्रिज येथून आणला असून, तो अकोला येथील सतीश मोटर्सच्या बाजूला टाकण्यासाठी तो घेऊन जात असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी मूर्तिजापूरचे उप विभागीय अधिकारी भागवत सैदाने यांनी अकोल्याच्या राजराजेश्वर कन्स्ट्रक्शन तथा अकोल्याचे पी.पी. देशमुख यांना २ लाख ३१ हजार २०० रुपये दंड केला आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातून सर्रास गौण खनिजाची चोरी बार्शीटाकळी तालुक्यातील सराव व पिंपळखुटा परिसरात काही स्टोन क्रेशरधारक बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन व त्याची विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे उप विभागीय अधिकाºयांनी केलेल्या उपरोक्त कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे एकाच पासवर दिवसभर गौण खनिजाची वाहतूूक, मेटलच्या पासवर गौण खनिज व मुरूमाची विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून येत आहे.