अकोला : अकोला परिमंडलांतर्गत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या २ लाख ३९ हजार ग्राहकांच्या तपासणीसाठी महावितरणने हाती घेतलेली धडक मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी वीजबिलाची थकबाकी भरून सहकार्य केले तर त्यांना तत्काळ नवीन मीटर देत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. तसेच वीजचोरी होत असल्याचे आढळल्यास त्या ग्राहकांवर वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिले आहे.
परिमंडलांतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील २ लाख ३९ हजार ग्राहकांचा २२३ कोटी ८५ लाखाच्या थकबाकीसाठी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करूनही ग्राहक वीजबिलाची थकबाकी भरण्यास तयार नाही. दरम्यान, कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या अकोला जिल्ह्यातील ६, बुलडाणा जिल्ह्यात ७४ आणि वाशिम जिल्ह्यातील १२ अशा ९२ जणांकडे वीजचोरी होत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर विद्युत कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एप्रिल आणि मे महिन्यात अनुक्रमे ८३० आणि १९१५ ग्राहकांकडून १८५ लाख रूपये थकबाकीपोटी वसूल करण्यात आले आहे.