अकोला : महावितरणच्या डीपी अर्थात रोहित्रावर असलेल्या वितरण पेट्यांची उघडी कवाडे बंद करण्यासाठी १४ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत मोहीम राबविण्यात आली. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील एकूण २ हजार ४३६ उघड्या असलेल्या वितरण पेट्यांचे दरवाजे यामध्ये बंद करण्यात आले. महावितरणच्याअकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांच्या सुरक्षित विद्युत यंत्रणा असण्याच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात आली आहे.विद्युत सुरक्षिततेचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करण्यासोबतच विद्युत अपघात होऊ नये, याकरिता विद्युत यंत्रणा सुरक्षित असण्यासाठी महावितरण कार्यरत असते; मात्र कारणे अनेक असली तरी अनेक वेळा ‘डीपी’वरील वितरण पेट्यांची दरवाजे उघडी व तुटलेली दिसतात. यासाठी स्वयंस्फूर्तीने एकाच वेळी बंद करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये अकोला (१०४९), बुलडाणा (११७९) व वाशिम जिल्ह्यातील (२०८) असे एकूण २ हजार ४३६ उघड्या असलेल्या वितरण पेट्यांचे दरवाजे यामध्ये बंद करण्यात आले. मुख्य अभियंता यांनी स्वत: पाहणी करीत अकोला शहरातील व बार्शीटाकळी उपविभागातील प्रत्यक्ष अनेक उघड्या असलेल्या वितरण पेट्यांचे दरवाजे बंद केली. अधीक्षक अभियंता पावनकुमार कछोट (अकोला) गुलाबराव कडाळे (बुलडाणा) आणि विनोद बेथारिया (वाशिम) यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये पूर्वनियोजन करून स्वत:सुद्धा यामध्ये सहभाग घेतला. यापुढेही अशाप्रकारे सदर मोहीम राबविली जाणार आहे.