अकोट तालुक्यात १८ मे रोजी रात्री वादळाने सुसाट वाऱ्यामुळे उपविभागातील १४ वीज उपकेंद्र बंद पडली होती. तसेच उच्चदाब वाहिनीचे आठ वीज खांब तुटलेत व लघु दाब वाहिनीचे ६५ खांबांवरील वीज प्रवाहाच्या तारा तुटल्या. वादळाचा जोर पाहता चक्क रोहित्र (डीपी) आधार दिलेल्या वीज खांबासह जमीनकडे वाकले. तारांवर मोठमोठी झाडं पडल्याने तालुका काळोखात बुडाला होता. शहर व ग्रामीण भागातील सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. पाऊस सुरू असल्याने महावितरण नेहमीप्रमाणे सकाळी वीजप्रवाह सुरू करणार असल्याने कोरोना महामारीच्या काळात रुग्णालय व रुग्ण व त्यांचे कुंटुबात धास्तावले होते. दरम्यान, अकोटचे उपकार्यकारी अभियंता गोपाल अग्रवाल यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली अकोट उपविभागातील अभियंता अजय वसू, अरुण जाधव, प्रफुल कोकाटे, देशपांडे तसेच अकोट उपविभागातील ८० तांत्रिक कर्मचाऱ्यांसह कंत्राटदार एजन्सीची टीम अशा १६० जणांनी पाऊस, वारा सुरू असताना अथक परिश्रम घेऊन रात्रंदिवस काम करून विद्युत पुरवठा सुरळीत केला. या वादळामुळे महावितरणचे २०-२५ लाखांचे साहित्यासह नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
वादळामुळे अकोट शहर व ग्रामीण वीज यंत्रणेचे २०-२५ लाखांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राट एजन्सी यांनी रात्रंदिवस अथक परिश्रम करून वीजपुरवठा सुरळीत केला.
-जी.एस. अग्रवाल, उपकार्यकारी अभियंता, अकोट