लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एमआयडीसीच्या फेज क्रमांक चारमधील एका गोदामात असलेला २० लाख रुपयांचा गुटखा साठा स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी छापेमारी करून जप्त केला. सदर गुटख्याची किंमत ५० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत असले, तरी पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात सदर गुटखा २० लाख रुपयांचा असल्याचे स्पष्ट केले.एमआयडीसीतील फेज क्रमांक चारमध्ये असलेल्या सिद्धांत नामक गोदामात राम आणि गंगाराम नामक गुटखा माफियांचा मोठा गुटख्याचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे यांना मिळाली. त्यांनी पथकासह सिद्धांत गोदामावर छापा टाकून तब्बल २० लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गंगाराम नामक गुटखा माफियास ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. गुटखा माफिया राम-गंगाराम यांची अकोल्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू असून, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांनी हा गोरखधंदा मोठ्या जोमाने सुरू केला आहे; मात्र त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी राम-गंगाराम या जोडगोडीचा गुटख्याचा मोठा साठा बुधवारी जप्त केला. विमलसह अन्य प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असून, तब्बल ११० पोती पोलिसांनी जप्त केले आहेत. यावरून राम आणि गंगाराम या दोन्ही गुटखा माफियांची मोठी उलाढाल जिल्ह्यात सुरू असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे, अशोक चाटी, शेख हसन, शेख माजीद यांच्यासह पथकाने केली.गुटखा साठ्यावर पाणी टाका!पोलीस मोठ्या मेहनतीने लाखो रुपयांचा गुटखा जप्त करतात; मात्र त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयातून हा गुटख्याचा साठा परस्पर गायब करण्यात येत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याचा मालावर पाणी टाकून तो खराब करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. सदर गुटखा पोलिसांनी पकडला असला, तरी त्या मोबदल्यात खराब झालेला गुटखा कार्यालयात ठेवून जप्त केलेला गुटखा गायब करण्यात येत आहे.
२० लाखांचा गुटखा जप्त
By admin | Published: June 29, 2017 12:43 AM