आकोट : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट सहकारी पतसंस्थेच्या आकोट शाखेत ठेवीदारांची लाखों रुपयाने फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बी.एच.आर.च्या संचालक मंडळासह २0 जणांविरुद्ध ६ जुलै रोजी आकोट शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आकोट येथील जेतवननगरातील रहिवासी उमेश भाऊराव घोडेस्वार यांनी दिलेल्या फिर्यादीत आकोट येथील बी.एच.आर. पतसंस्थेत ठेवीदारांनी व स्वत: ठेवी म्हणून गुंतविलेल्या मूळ रकमेवर जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. तसेच मुदत संपल्यावरही मूळ रक्कम, व्याज देण्यास टाळाटाळ केली. १३ टक्के व्याजदर याप्रमाणे एक वर्षाकरिता ४ लाख रुपयांच्या ठेवी जमा करण्यात आल्या होत्या. या ठेवींची मुदत संपल्यानंतर व्याजासह ४ लाख ५२ हजार रक्कम मिळणे अपेक्षित होते. शिवाय पायल मारु यांनासुद्धा व्याजासह २ लाख २६ हजार, रवी जुमळे यांना व्याजासह ८ लाख ७ हजार २२६, रवींद्र बोराखडे व किरण बोराखडे या संयुक्त ठेवीदारांना व्याजासह १ लाख १६ हजार अशा अनेक ठेवीदारांना ठेवींची मुदत संपल्यावरही व्याजासह रक्कम परत करण्यास पतसंस्थेने टाळाटाळ केली. त्यामुळे खोटा विश्वास निर्माण करून फसवणूक झाल्याची तक्रार आकोट शहर पोलिसात करण्यात आली. या तक्रारीवरून आरोपी व्यवस्थापक मयूर विखे तसेच प्रमोद रायसोनी, दिलीप चोरडिया, मोतीलाल जिरी, सुरजमल जैन, दादा पाटील, भगवान माळी, राजाराम कोळी, भगवान वाघ, डॉ.हिरेंद्र महाजन, इंद्रकुमार लालवानी, शेख रमजान अ.नबी अन्सार, ललिताबाई सोनोने, प्रतिभाबाई जिरी, सुखलाल माळी, यशवंत जिरी, दिनेश चौधरी, अशोक राजपूत, श्रेयस नळवाडे, वैशाली पाटील यांच्या विरुद्ध भादंविच्या ४२0, ४0६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकोट पोलीस स्टेशनमध्ये २0 जणांवर गुन्हे दाखल
By admin | Published: July 07, 2015 1:41 AM