- नितीन गव्हाळे
अकोला: शिक्षक भरतीसाठी शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि अभियोग्यता चाचणी दिलेल्या पात्र शिक्षकांकडून जाहिरातींच्या माध्यमातून अर्ज मागविले आहेत. पवित्र पोर्टल पात्र उमेदवार शिक्षकांना अर्ज करताना, राखीव संवर्गाच्या २0 शाळा पर्याय म्हणून निवडाव्या लागणार आहेत. ११ मार्चनंतर पात्र शिक्षकांना पवित्र पोर्टलवर माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहेत.गत काही दिवसांपासून शिक्षक भरतीची चर्चा सुरू होती. या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून, शिक्षक भरतीच्या वृत्तपत्रांमधून जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. इयत्ता पहिली ते आठवीसाठी टीईटी आणि टेट परीक्षा दिलेल्या आणि इ. नववी ते बारावीसाठी टेट परीक्षा दिलेल्या शिक्षकांना पवित्र पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. अभियोग्यता चाचणी दिलेल्या आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या बेरोजगार शिक्षकांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पात्र शिक्षक पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी सज्ज आहेत; परंतु काय माहिती भरावी, याबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलवरच अर्ज कसा करावा, कोणती माहिती भरावी, यासंबंधीची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. पवित्र पोर्टलवर रिक्त जागांच्या जाहिराती शिक्षण संस्थांनी भरल्या आहेत, तसेच वृत्तपत्रांमध्येसुद्धा जातीच्या संवर्गानुसार रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. या शिक्षण संस्थांमधील राखीव व संवर्ग पाहून, पात्र शिक्षकांना पवित्र पोर्टलवर कागदपत्रांसह शैक्षणिक, वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे, तसेच ज्या ठिकाणी उमेदवाराच्या जात संवर्गानुसार जागा उपलब्ध असतील. त्या शिक्षण संस्थांच्या २0 शाळा पर्याय म्हणून निवडाव्या लागणार आहेत. उमेदवारांना माहिती भरण्यासाठी ११ मार्चपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्यांसाठी एक टक्का जागा राखीव!राज्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी शिक्षक भरतीमध्ये एक टक्का जागा राखीव ठेवल्या आहेत. या राखीव जागांवर आत्महत्याग्रस्त पाल्यांना प्राधान्य दिल्या जाणार आहे. त्यासाठी या पाल्यांना पुराव्यासह पवित्र पोर्टलवर माहिती भरावी लागणार आहे आणि इतर कागदपत्रेही अपलोड करावी लागणार आहेत.सध्या पवित्र पोर्टल व वृत्तपत्रांमधून शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. उमेदवारांना २0 शाळांचे पर्याय आहेत. ज्या शाळेत त्यांच्या संवर्गाची जागा रिक्त आहे, त्यासाठी त्यांनी अर्ज करावे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठीही एक टक्का जागा राखीव आहे.-देवेंद्र अवचार, उपशिक्षणाधिकारीमाध्यामिक जि.प.