- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी अकोला शहरातील दुर्धर आजारग्रस्तांच्या आरोग्याची दररोज विचारपूस करून, त्यांच्यावर लक्ष (वॉच ) ठेवण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत २० पथके गठित करण्यात आली असून, दुर्धर आजारग्रस्तांवर ‘वॉच’ ठेवण्याचे काम लवकरच या पथकांमार्फत सुरू करण्यात येणार आहे.अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, महानगरपालिका प्रशासनामार्फत शहरातील घरोघरी नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये १८ जूनपर्यंत ७७ हजार १३३ कुटुंबांच्या आरोग्य तपासणीचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी दुर्धर आजारग्रस्तांच्या आरोग्यावर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने आरोग्य तपासणीच्या सर्वेक्षणात आढळून आलेल्या मधुमेह, रक्तदाब व आॅक्सिजनचे प्रमाण कमी असणे इत्यादी दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत महानगरपालिका व महसूल कर्मचाऱ्यांची २० पथके गठित करण्यात आली आहेत.
दुर्धर आजारग्रस्तांची संख्या!अकोला शहरात १८ जूनपर्यंत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीच्या सर्वेक्षण अहवालानुसार शहरात मधुमेहग्रस्त ४ हजार ९०,रक्तदाबग्रस्त ५ हजार ८९ आणि आॅक्सिजनचे प्रमाण ८५ टक्क्यापेक्षा कमी असणारे ३५८ अशी दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींची संख्या आहे.
शहरातील दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींच्या आरोग्यासंदर्भात नियमित विचारपूस करून, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिका व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची २० पथके गठित करण्यात आली आहेत.-संजय खडसेनिवासी उप-जिल्हाधिकारी.