अकोला : राज्यातील २0 टक्के अनुदान दिलेल्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे दोन महिन्यांपासूनचे वेतन थकीत होते. यासंदर्भात राज्य खासगी शिक्षक संघटनेने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले. अखेर शासनाने शिक्षकांचे थकीत वेतन देण्याचे निर्देश २0 जानेवारी रोजी शिक्षण विभागाला दिले आहेत.आधीच प्राथमिक शिक्षकांना २0 टक्क्यांनुसार अत्यल्प वेतन मिळते. त्यातही अनेक वेतन प्रलंबित राहते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण कसे भागवावे, असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण होता. यापूर्वीसुद्धा सहा महिन्यांचे वेतन शिक्षण विभागाकडे थकीत होते. हे वेतन निघत नाही, तोच पुन्हा दोन महिन्यांचे वेतन प्रलंबित होते. या वेतनाबाबत राज्य खासगी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मनीष गावंडे व पदाधिकाऱ्यांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेत, त्यांच्यासमोर प्राथमिक शिक्षकांच्या थकीत वेतनाची समस्या मांडून वेतन देण्याची मागणी केली. तसेच संघटनेच्यावतीने १७ जानेवारी रोजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देऊन शिक्षकांच्या थकीत वेतनाची समस्या निकाली काढण्याची मागणी केली होती. मागणीची पूर्तता न झाल्यास २६ जानेवारी रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर त्याची दखल घेत, शिक्षण मंत्र्यांनी उणे प्राधिकाराने वेतन काढण्याचे शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)