निंबा फाटा(अकोला) : परिसरात १७ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कवठा बॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे बॅरेजचे दरवाजे उघडण्यात आले. या पाण्यामुळे धरणाच्या समोरील सिमेंटचे ब्लॉक व २०० फूट लांब संरक्षक भिंत अक्षरश: उखडली आहे. यामध्ये कंत्राटदाराचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.कवठा बँरेजचे समोरचे गेट उघडल्यानंतर पाणी आदळून जमीन खरडून जाऊ नये, याकरिता २०० ते ३०० फूट सिमेंटचे ब्लॉक व दोन भिंती उभारण्यात आल्या होत्या; मात्र काल झालेल्या मुसळधार पावसानंतर गेटमधून पाणी सोडल्यानंतर या भिंती व ब्लॉक तुटून दूरपर्यंत फेकल्या गेले. यामुळे कामाचे पितळ उघडे पडले असून, या बँरेजच्या अशा कामामुळे कवठा गावालाच भविष्यात धोका निर्माण झाला आहे. या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करण्याची व निकृष्ट काम करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी सरपंच सुमेध घ्यारे यांनी केली आहे.(वार्ताहर)कवठा बॅरेजच्या गेटसमोर पाणी आदळून जमीन खरडून जाऊ नये, याकरिता उभारण्यात आलेल्या ब्लॉक व सिमेंट भिंतीचे काम अर्धवट असल्यामुळे पाण्याच्या दाबाने ते उखडून गेले. कंञाटदाराचे अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे; मात्र कंत्राटदाराला हे काम नव्याने करून द्यावे लागेल. - -- दिलीप भालतिडक, अभियंता पाटबंधारे विभाग, अकोला.कवठा बँरेजचे काम गावाला लागूनच वरच्या बाजूस झाले आहे. पहिल्याच पाण्यात ब्लॉक व सिमेंटची भिंत ढासळली, त्यामुळे गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या बॅरेजच्या संपूर्ण कामाची सखोल चौकशी व्हावी.- सुमेध घ्यारे, सरपंच कवठा.