संतोष येलकर, अकोला: यंदाच्या उन्हाळ्यात मे अखेरपर्यंत जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या २०४ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, त्यासाठी ३ कोटी ५० लाख ६ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. टंचाईग्रस्त १८६ गावांमध्ये उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आल्याने, ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या समस्येपासून दिलासा मिळाला.
यंदाच्या उन्हाळ्यात मे अखेरपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये जिल्ह्यातील २५८ गावांसाठी पाणीटंचाई निवारणाच्या विविध ५७० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३१ मे अखेरपर्यंत १८६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या २०४ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, जिल्ह्यातील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या आठ उपाययोजनांची कामे सद्य:स्थितीत सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आलेल्या संबंधित टंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाईची समस्या कमी झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
पूर्ण केलेल्या उपाययोजना कामांची अशी आहे संख्या!
- उपाययोजना - गावे - कामे
नवीन विंधन विहिरी - ८१ - ९४कूपनलिका - ८८ - ९३खासगी विहिरींचे अधिग्रहण - १७ - १७
- आठ विंधन विहिरींची कामे सुरू!
जिल्ह्यातील सहा गावांत पाणीटंचाई निवारणासाठी आठ विंधन विहिरींची कामे सद्य:स्थितीत सुरू असून, लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
- प्रशासकीय मान्यतेनंतर करण्यात आली कामे!
पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात समाविष्ट उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांकडून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर जिल्ह्यात संबंधित पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची कामे करण्यात आली.
- पूरक आराखड्यातील उपाययोजना पूर्ण होणार?
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जून अखेरपर्यंतच्या कालावधीसाठी पाणीटंचाई निवारणाच्या पूरक कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ५ जून रोजी मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील २० गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या २० उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत; लवकरच जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर पूरक आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांची कामे पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.