अकोला - दर चार वर्षांनी होणा-या अखिल भारतीय व्याघ्र्रगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगलांतील वाघ व अन्य मांसभक्ष्यक प्राणी व तृणभक्ष्यी प्राण्यांची गणना २० ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे.सहा दिवस चालणारी ही गणना ‘ट्रांजेक्ट’ पद्धतीने होणार असून, याबाबतचा संपूर्ण अहवाल १५ मार्चपर्यंत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली व भारतीय वन्यजीव संस्थान, देहरादुन यांना सादर करण्यात येणार आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.व्याघ्र प्रगणना २०१८चा प्रथम टप्पा म्हणून राज्य स्तरावर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण डिसेंबर महिन्यात पेंच व्याघ्र प्रकल्प येथे पार पडले. या प्रगणनेचे विविध टप्पे निश्चित करण्यात आले असून, ते विशिष्ट कालावधीत पूर्ण करावयाचे आहेत. संपूर्ण देशात ही प्रक्रिया सुरू झाली असून, महाराष्ट्रात ७ जानेवारीपासून त्याची रंगीत तालीम होणार आहे.प्रत्यक्षात क्षेत्रीय माहिती गोळा करण्याचे काम २० जानेवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये प्रथमतीन दिवस मांसभक्ष्यक प्राणी भ्रमण मार्ग (एसईआर)वर फिरणे व नंतरचे तीन दिवस तृणभक्ष्यक प्राणी नोंदसाठी २.५ किमीचे ट्रांजेक्टवर फिरणे, अशी ही प्रक्रिया असणार आहे.
२० जानेवारीपासून राज्यात व्याघ्रगणना!, सहा दिवसांचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 5:03 AM