बुलडाणा : पश्चिम वर्हाडात १ जून ते २१ सप्टेंबर या चार महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे २१ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात अकोला जिल्ह्यातील ९ तर बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील प्रत्येकी ६ व्यक्तींचा समावेश आहे. तर जनावरांची मृत्युमुखी पडण्याची संख्या जास्त असल्यामुळे शेतकर्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे पश्चिम वर्हाडातील शेतकरी त्रस्त झाला आहे; मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाले तुडुंब भरले. त्यामुळे अनेक ठिकाणची पाणीटंचाई दूर झाली; मात्र या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी शेतकर्यांना आपला जीव गमवावा लागला. या नैसर्गिक आपत्तीमुळे अकोला जिल्ह्यामधील ९, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक ६ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात वीज पडून मरणार्यांची संख्या सर्वाधिक अकोला जिल्ह्यात असून, चार महिन्यांच्या कालावधीत ७ जणांचा मृत्यू झाला असून, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील २ व्यक्तींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घराची एकूण संख्या १३ असून, त्यात वाशिम ५, अकोला, ४, बुलडाणा ४ असा समावेश आहे. या घटनेत घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तर अंशत: पडझड झालेल्या घरांचा आकडा यापेक्षा मोठा आहे.
नैसर्गिक आपत्तीने घेतले २१ बळी
By admin | Published: October 03, 2015 2:34 AM