अकोला : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व २१ एप्रिल रोजी श्रीराम नवमी उत्सवानिमित्त या दोन दिवसांसाठी जिल्ह्यातील सुमारे २११ गुंड प्रवृत्तीचा इसमांना तडीपार करण्यात आले आहे. अकोला पोलिसांनी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केलेला प्रस्तावानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात येणार आहे. या सोबतच २१ एप्रिल रोजी श्री रामनवमी जन्मोत्सव जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. हे दोन्ही धार्मिक उत्सव लक्षात घेता शहरासह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला पोलिसांनी अकोला उपविभागीय दंडाधिकारी, मूर्तिजापूर उपविभागीय दंडाधिकारी, बाळापूर उपविभागीय दंडाधिकारी व अकोट उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे गुंड प्रवृत्तीच्या युवकांना जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार अकोला उपविभागीय दंडाधिकारी यांनी अकोला तालुक्यातील सुमारे १४१ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. त्यानंतर अकोट उपविभागीय दंडाधिकारी यांनी २८ गुन्हेगार, बाळापूर उपविभागीय दंडाधिकारी यांनी १२ व मूर्तिजापूर उपविभागीय दंडाधिकारी यांनी ३० गुन्हेगारांना दोन दिवसांसाठी अकोला जिल्ह्यातून तडीपार केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ (२) नुसार पोलिसांना असलेल्या अधिकारांचा वापर करून या गुंडांवर तडीपारी करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे २११ गुन्हेगार दोन दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यासाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी प्रस्ताव सादर करण्यासाठी पोलिसांना मार्गदर्शन केले.