अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची हालत खस्ता झाली आहे. सात तालुक्यांतील २१७ वर्गखाेल्या धाेकादायक असून, या वर्गखाेल्या व काही प्राथमिक शाळा इमारत बांधकामांसाठी ९ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शाळांच्या याद्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाकडे सादर करण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षभरापासून शाळांचे लाॅक कायमच आहे. सध्या काेराेनाची रुग्णसंख्या घटली असली तरी शाळा सुरू हाेण्याबाबत कुठलेही संकेत नसले तरी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शासनाने आदेश काढला आहे. रुग्णसंख्या आटाेक्यात राहिली, तर कदाचित शाळा सुरू करण्याबाबतही निर्णय हाेऊ शकताे. त्या पार्श्वभूमीवर धाेकादायक वर्गखाेल्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनांतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिकस्त झालेल्या इमारती पाडून, नवीन इमारत बांधकामांसाठी ९ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या नवीन इमारतींची बांधकामे आणि शाळा इमारतींच्या दुरुस्तीकामांची यादी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केली असून, त्यामध्ये शिक्षण समितीने मंजूर केलेली अनेक कामे नसल्याच्या मुद्द्यावर जिल्हा शिक्षण समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली हाेती. त्यामुळे ही यादी पुन्हा बदलण्याची चिन्हे आहेत.
...अशी आहे स्थिती
शिकस्त शाळांची संख्या
तालुका संख्या
अकोट ४३
अकोला ०५
पातूर १२
बाळापूर १०
बार्शिटाकळी २२
मूर्तिजापूर १७
शाळांच्या दुरुस्तीबाबत जिल्हा नियाेजन समितीने निधी मंजूर केला असून, जिल्हा शिक्षण समितीने मंजूर केलेल्या कामांचा समावेश करून या निधीतून शाळा दुरुस्तीबाबतचे नियाेजन आहे.
-डाॅ. वैशाली ठग, शिक्षणाधिकारी प्राथमिक