अकाेला : संकटे सांगून येत नाहीत; परंतु त्याची चाहूल देत असतात. ही चाहूल ओळखूनच शहराचे नियाेजन करण्याची जबाबदारी जशी महापालिकेची आहे, तशीच ती स्थानिक लाेकप्रतिनिधींची देखील आहे. दुर्दैवाने या दाेघांकडूनही जाणीवपूर्वक कानाडाेळा केला जात असल्याचे परिणाम सर्वसामान्य अकाेलेकरांना भाेगावे लागल्याचे नुकतेच समाेर आले आहे. राजकारणी, बड्या बिल्डरांकडून हाेणारे अतिक्रमण व मनपाच्या नियाेजनशून्य कारभारामुळे शहराची वाट लागली आहे. भविष्यात अतिवृष्टी झाली तर २२ भागांना पुराचा धाेका असल्याची माहिती आहे.
अकाेलेकर गाढ झाेपेत असताना शहरात २१ जुलैच्या मध्यरात्री मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागातील घरांमध्ये व बाजारपेठेत पाणी शिरताच हाहाकार उडाला. माेर्णा नदीच्या पूर नियंत्रण रेषेला ठेंगा दाखवत स्थानिक राजकारण्यांच्या आशीर्वादाने बड्या बिल्डरांनी रहिवासी इमारती, डुप्लेक्स उभारून त्यांची चढ्या दराने विक्री केली. सखल भागात रहिवासी इमारती उभारताना सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी नाल्यांची व्यवस्थाच निर्माण केली नाही. हा प्रकार कमी म्हणून की काय, माेठे नाले बुजवून त्यावरही घरे बांधली. त्यामुळे वस्त्यांमध्ये शिरलेल्या पाण्याचा निचरा न हाेता ते घरांमध्ये शिरले. गुंठेवारी जमिनीचे रितसर ले-आउट न करता त्यावर घरे बांधण्याचा सपाटा प्रभावी राजकारण्यांसह बांधकाम व्यावसायिकांनी केल्याचे परिणाम समाेर आले. याकडे महापालिका प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या मुळावर उठले आहे.
शहरात याठिकाणी पुराचा धाेका
काैलखेड, खडकी, एमराॅल्ड काॅलनी, गीतानगर, गंगानगर, कमलानगर, कायनात काॅलनी, रमाबाई आंबेडकरनगर, अण्णाभाऊ साठेनगर, अनिकट, शिवसेना वसाहत, बाळापूर राेड, नरेंद्रनगर, गाेकर्णा पार्क, काळेनगर, डाबकी, भगतवाडी, आरपीटीएस परिसर, शिलाेडा, नायगाव, वाकापूर, मलकापूर जुने भागात पुराचा धाेका वाढला आहे.
नाल्यांची व्यवस्थाच नाही !
बांधकाम व्यावसायिकांनी ले-आऊटचे निर्माण करताना सांडपाण्याचा निचरा हाेण्यासाठी नाल्यांची ठाेस व्यवस्थाच उभारली नाही. काही बहाद्दर राजकारण्यांनी जमीन खरेदी केल्यावर त्यामधील जुने नाले बुजवून टाकले. याकडे मनपाने कानाडाेळा केल्याने पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली.
पाऊस नको नको सा !
पावसाच्या पाण्याचा निचरा हाेण्याची पर्यायी व्यवस्था नाही. नाल्या नसल्यामुळे पाणी तुंबते. त्यामुळे साप व विषारी जीवजंतूंची समस्या निर्माण झाली आहे.
-राम लाखपूरकर, नरेंद्रनगर, प्रभाग ८
माेठ्या नाल्यांतील जलकुंभीच्या समस्येमुळे पाण्याचा निचरा न हाेता ते घरात शिरते. यासाठी मनपाचे उदासीन धाेरण कारणीभूत ठरत आहे. पुराच्या पाण्यात कॅटरिंगचे सर्व साहित्य भिजले.
- रवी हरिभाऊ अवचार रमाबाई आंबेडकरनगर, प्रभाग १७
पालिकेचे तेच ते रडगाणे
नागरिकांनी नाल्यांवर दुकानांचे ओटे बांधले आहेत. काही ठिकाणी चक्क नाल्यावर घराच्या भिंती आहेत. ते हटविण्यासाठी गेल्यावर सामूहिक विराेध हाेताे. नाल्यांमध्ये नारळ, प्लास्टिक पिशव्यांचा खच आढळताे.
-विठ्ठल देवकते, क्षेत्रीय अधिकारी, उत्तर झाेन