अकोला : शुभमंगल सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये दोन वर्षांपूर्वी विवाह केलेल्या जिल्ह्यातील २२० जोडप्यांना प्रत्येकी १० हजार रुपयेप्रमाणे अनुदानाची रक्कम अद्याप मिळाली नाही. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी उपलब्ध झाला नसल्याने, अनुदानाच्या रक्कमेचे वाटप रखडले असल्याने, अनुदानाच्या रकमेसाठी जोडप्यांना जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयात ‘फेरे’ मारावे लागत आहेत.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या शुभमंगल सामूहिक विवाह योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांत विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक जोडप्यांना १० हजार रुपयेप्रमाणे अनुदान दिले जाते. २०१६....१७ व २०१७....१८ या दोन वर्षांत जिल्ह्यात सामूहिक विवाह सोहळ्यांत विवाहबध्द झालेल्या २२० जोडप्यांना मात्र अद्याप प्रोत्साहन अनुदानाच्या रकमेचा लाभ मिळाला नाही. सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना अनुदानाची रक्कम वाटप करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध झाला नसल्याने, जोडप्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम अद्याप जमा करण्यात आली नाही. त्यामुळे अनुदानाच्या रकमेसाठी सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांवर जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयात फेरे मारण्याची वेळ आली आहे.
२५.९३ लाख रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव!
सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह केलेल्या २२० जोडप्यांना प्रत्येकी १० हजार रुपयेप्रमाणे अनुदानाची रक्कम वाटप करण्यासाठी २५ लाख ९३ हजार रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयामाफत जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला, परंतु अद्याप निधी उपलब्ध झाला नसल्याने अनुदानाच्या रकमेचे वाटप रखडले आहे.
शुभमंगल सामूहिक विवाह योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये विवाह केलेल्या जिल्ह्यातील २२० जोडप्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी २५ लाख ९३ हजार रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर अनुदानाची रक्कम जोडप्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
- एम.जी.मोरे, परिविक्षा अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय