अकोला : राज्यात ऊर्जा विभागाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० ची अंमलबजावणी धडाक्यात सुरु झाली आहे. महावितरणच्याअकोला परिमंडळाअंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिक जिल्ह्यात २८ जानेवारीपर्यंत लघुदाब वाहिनीच्या वीजखांबापासून ३० ते ६०० मीटरपर्यंत अंतर असलेल्या २२८ वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या. कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार लघुदाब वीजवाहिनीच्या खांबापासून ३० मीटरच्या आत असलेल्या कृषिपंपांना परिसरातील नजिकच्या रोहित्राची क्षमता पर्याप्त असल्यास नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासोबतच ज्या कृषिपंपांद्वारे अनधिकृत वीजवापर सुरु आहे त्यांनाही नवीन वीजजोडण्या देण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी रोहित्रांची क्षमता पर्याप्त नाही, त्या रोहित्रांची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. कृषिपंप वीजजोडणी धोरण राबविण्यासाठी सुरू करण्यात आल्याच्या आठ दिवसात राज्यात एकूण ७ हजार ८४ कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या अाहेत. यामध्ये अकोला परिमंडळातील २२८ जोडण्यांचा समावेश आहे. गेल्या पंधरवड्यापासून वीजखांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना प्राप्त झालेल्या किंवा प्रलंबित असलेल्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करून नियमाप्रमाणे मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्षात वीजजोडणी देण्यास देखील प्रारंभ करण्यात आला.
महा कृषी ऊर्जा अभियान
या अभियानानुसार लघुदाब वाहिनीपासून ३० मीटर व २०० मीटरच्या आत आणि रोहित्राची क्षमता पर्याप्त असलेल्या ठिकाणी तसेच उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपर्यत उच्चदाब वितरण प्रणाली (HVDS) द्वारे एका रोहित्राद्वारे जास्तीतजास्त दोन कृषिपंपांना वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच उच्चदाब वाहिनीपासून ६०० मीटरपेक्षा अधिक अंतरावरील कृषिपंपांना सौर ऊर्जेद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे.