लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेच्या शिक्षक समृद्धी कर्मचारी पतसंस्थेमध्ये २०१२ ते २०१७ या पाच वर्षात तब्बल २३ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक यांनी लेखा परीक्षण अहवालाची पडताळणी केल्यानंतर गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस येताच या प्रकरणाची तक्रार रामदासपेठ पोलीस ठाण्यात केली असून, पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्ष, व्यवस्थापकासह १० संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.अकोला महानगरपालिकेच्या शिक्षक समृद्धी कर्मचारी पतसंस्थेत अतिरिक्त भाग भांडवल, अनामत रक्कम काढणे, खोट्या नोंदीद्वारे रक्कम काढणे, खर्चाची देयके नसताना रक्कम अदा करणे, बोगस सभासद दाखवून रक्कम अदा करणे यासह विविध प्रकाराने मोठ्या प्रमाणात घोटाळा होत असून, लाखो रुपयांचा व्यवहार असलेली कागदपत्रे गायब केली जात असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाली होती.या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे लेखा परीक्षक विनायक तायडे यांनी लेखा परीक्षणात गैरव्यवहाराचा अहवाल तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर केला होता.या अहवालानुसार शिक्षक समृद्धी कर्मचारी पतसंस्थेच्या कागदपत्रांची पडताळणीत २०१२ ते २०१७ दरम्यान अध्यक्ष, संचालक आणि व्यवस्थापक यांनी २३ लाख २ हजार ९६३ रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड झाले.यामध्ये संस्थेचे अध्यक्ष नरेश बाबुलाल मूर्ती रा. रामनगर म्हाडा कॉलनी रतनलाल प्लॉट, व्यवस्थकापक नीलेश सुधाकर गुहे रा. साई नगर जुने शहर यांच्यासह शरद पांडुरंग टाले उपाध्यक्ष रा. स्वालंबी नगर गोरक्षण रोड, नानाजी नीळकंठ किनाके माजी सचिव रा. खदान, किशोर श्रावण सोनटक्के सचिव रा. शिवाजी नगर, सुनीता रवींद्र चरकोलू संचालिका रा. गड्डम प्लॉट, नसिहा तबस्सुम मो. हातीम संचालिका रा. फिरदोस कॉलनी, रागिनी सदानंद घरडे संचालिका रा. गुलजारपुरा, प्रकाश डिगांबर फुलउंबरकर संचालक रा. फडके नगर, डाबकी रोड, नितीन त्र्यंबकसा नागलकर रा. शिवाजी नगर, संगीतराव पुंडलीकराव थोरात रा. नगर परिषद कॉलनी, गजेंद्र माणिकराव ढवळे रा. पोळा चौक, सोनटक्के प्लॉट या १२ आरोपींनी हा गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांच्या आदेशावरून शनिवारी अध्यक्ष, १० संचालक, एका व्यवस्थापकासह १२ जणांविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या ४२०, ४०६, ४०९, ४०६, ४६८, १२० ब, २०१, ५०६, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
शिक्षक समृद्धी पतसंस्थेत २३ लाखांचा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 10:14 AM