अकोला : ग्राहकांना ई-मेलद्वारे वीज बिल मिळावे, तसेच इतर विविध सुविधांचा लाभ घेता यावा, यासाठी महावितरणने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत राज्यभरातील सुमारे २३ लाख वीज ग्राहकांनी त्यांचा मोबाइल क्रमांक अथवा ई-मेल आयडीची नोंदणी महावितरणकडे केली आहे. वीज ग्राहकांनी जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणकडून सध्या प्रायोगिक तत्त्वावर मासिक वीज बिलाची माहिती मोबाइल एसएमएसद्वारे पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर शहर, औरंगाबाद व वाशी या शहरातील वीज ग्राहकांना पाठविण्यात येत आहे. याशिवाय ई-मेल आयडीची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार ईमेलद्वारे वीज बिल पाठविण्यात येत आहे. मोबाइल क्रमांक किंवा ई-मेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या शिवाय महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा महावितरणच्या मोबाइल अँपवर नोंदणीची सुविधा आहे. सध्या राज्यातील सुमारे २३ लाख वीज ग्राहकांनी मोबाइल अथवा ई-मेल आयडीची नोंदणी केली आहे. वीज ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावरून टोल फ्री कॉल सेंटरमध्ये तक्रार नोंदविताना ग्राहक क्रमांक किंवा नाव व पत्ता आदी माहिती देणे गरजेचे राहणार नाही. वीज ग्राहकांना केवळ तक्रारीचे स्वरूप सांगावे लागणार आहे. तसेच ई-मेल आयडीची नोंदणी केल्यास ग्राहकांसमोर ई-बिल व गो ग्रीन असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
‘ई मेल’द्वारे वीज देयकांसाठी २३ लाख ग्राहकांची नोंदणी
By admin | Published: June 30, 2016 1:49 AM