अकोला : जिल्ह्यात कोविडने पुन्हा धुमाकूळ घातला असून, आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तसेच सर्वोपचार रुग्णालयातही कोरोनाने शिरकाव केला आहे. अधिष्ठातांसह जीएमसीतील २४ आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बाब रविवारी उघडकीस आली. पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना काेरोनाची सौम्य लक्षणं असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. गत आठवडाभरापासून जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्येचा आलेख वाढताच आहे. त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वोपचार रुग्णालयात कोविड वॉर्ड पुन्हा सक्रिय करण्यात आले आहेत. अशातच रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांचाही कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. अधिष्ठातांसह सर्वाेपचार रुग्णालयातील सुमारे २४ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. कोविड पॉझिटिव्ह आलेल्या सर्वच वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविडची सौम्य लक्षणं असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने जीएमसी प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेतली जात आहे.
कुटुंबीयही पॉझिटिव्ह
वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोपचार रुग्णालयातील पॉझिटिव्ह आलेल्या काही वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यदेखील पॉझिटिव्ह आहेत. कोविडची सौम्य लक्षणे असल्याने त्यांनाही गृह अलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
परिचारिकांचा समावेश
अधिष्ठातांव्यतिरिक्त पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मेट्रन आणि काही परिचारिका असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरीही अनेकजण टाळताहेत मास्क
सर्वोपचार रुग्णालयात इतर रुग्णांसह कोविड रुग्णही दाखल होतात. त्यामुळे रुग्णालय परिसरात कोविड संसर्गाचा धोका जास्त आहे. अशा परिस्थितीत रुग्णालय परिसरात मास्कचा वापर करणे गरजेचे आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. रुग्ण व त्यांच्यासोबत येणारे बहुतांश नातेवाईक विनामास्क असतात. शिवाय, काही कर्मचारीदेखील विनामास्क असल्याचे पाहायला मिळते. ही स्थिती पाहता विनामास्क आढळणाऱ्या व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे.
सर्दी, खोकला असेल तर सावधान!
गत आठवडाभरापासून पॉझिटिव्ह येणाऱ्या बहुतांश रुग्णांमध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणे आढळली आहेत. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला होत असला, तरी हे लक्षणे कोरोनाचीदेखील असू शकतात. त्यामुळे सर्दी, खोकला वेळेत बरा झाला नाही, तर तत्काळ कोविड चाचणी करुन घेण्याचे आवाहन डॉक्टर करतात.