अडगाव(अकाेला): वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने जंगलात दोघांनी २४ गावठी बॉम्ब पेरल्याची माहिती वन्य जीव विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त हाेताच वन्य जीव विभागाच्या फिरत्या पथकाने मंगळवारी छापा घालून अडगाव शेत शिवारातील जंगलात जिवंत गावठी बॉम्ब पेरताना दोघांना रंगेहात पकडले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.
वन परिक्षेत्र अधिकारी व वन्यजीव विभाग अकोट यांचे फिरते पथक गस्तीवर असताना, त्यांना अडगाव शेतशिवारात गावठी बॉम्ब पेरल्याची माहिती मिळाली. पथकाने हिवरखेड ठाणेदारांना याची माहिती दिली. यावेळी वन्य जीव विभाग व पाेलिसांनी छापा घातला. यावेळी अडगाव शेतशिवारात रानडुकरांची शिकार करण्याच्या उद्देशाने आरोपी तेजपाल सिंह करतार सिंह जुनी(रा. निमखेडी ता. संग्रामपूर) आणि किरपाल सिंह तुतुसिंह बाबर (रा. निमखेडी) हे जंगलात गावठी बॉम्ब पेरत असल्याचे आढळून आले. दोघाही आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्या विरुद्ध वन कायदा, वन्य जीव अधिनियम १९७२ कलम ९, २७, २९, ३१, ३१, ३९, ४८, ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल २४ गावठी बॉम्ब जप्त केेले. यावेळी गावठी बॉम्बमुळे मृत झालेले रानडुकरही पोलिसांना आढळून आले. आरोपींना अकोला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई उपवनसंरक्षक के.आर. अर्जुन, सहायक वन रक्षक सुरेश वडोदे, वन परीक्षेत्र अधिकारी एस.एस.सिसरसाट, वन मंडळ अधिकारी अजय बावणे, वनरक्षक एस.जी. जाेंधळे, वनरक्षक डी.ए. सुरजुसे, जी.पी. घुले यांच्या पथकाने केली.