अकोला : पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यातील २४ हजार २४७ पर्यावरण स्नेही ग्राहकांनी छापील वीजबिल नाकारत कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो - ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महीन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रूपयाची तर,वर्षाला १२० रूपयाची सुट देण्यात येते.
पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी महावितरणकडून पर्यावरणपुरक 'गो-ग्रीन' योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वीज बिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएस चा पर्याय देण्यात येतो. महावितरणच्या पर्यावरणपुरक सेवेसाठी प्रोत्साहन म्हणून ग्राहकांना प्रती बिलात दहा रुपये सवलत देण्यात येते. त्यामुळे वीज बिलामध्ये वार्षिक एकशे वीस रुपयांची बचत होते. विज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच एसएमएस द्वारे दरमहा विज बिल प्राप्त होणार असल्याने ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट्सह ते तात्काळ ऑनलाइन द्वारे भरण्याची सोय उपलब्ध होते.
ग्रो ग्रीन पर्याय निवडलेले ग्राहक
जिल्हा : ग्राहकअकोला : ४,७४४बुलडाणा : ५,६५७वाशिम : २,२४४अमरावती : ६,८८५यवतमाळ : ४,७२०
'गो-ग्रीन' निवडण्यासाठी काय करावे?
महावितरण 'गो-ग्रीन' योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जी जी एन या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाईल ॲप द्वारे किंवा संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंक वर जाऊन करावी लागणार आहे.याबाबतची अधिक माहिती महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.