अकोला : पाणीटंचाईचे चटके सहन करीत असलेल्या अकोला एमआयडीसीने यंदा औद्योगिक परिसरात २५ हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्धार केला आहे. त्याची तयारी सुरू असून, प्रत्येक उद्योजकाला वृक्ष लागवडीची सक्ती केली जाणार आहे.अकोला एमआयडीसीत जवळपास सहाशे विविध उद्योग आहेत. कोट्यवधींचा उद्योग करणाऱ्या व्यावसायिकांचे उद्योग यंदा केवळ पाण्याअभावी अडचणीत सापडले आहेत. काटेपूर्णातील पाणी संपुष्टात आल्याने कुं भारी तलावाचे पाणी उद्योगांसाठी पुरविले गेले. मात्र आता कुंभारीचा तलावही आटल्याने बोअरवेल्स आणि हायड्रंटचा आधार घ्यावा लागत आहे. सातशे- पाचशे रुपये प्रतिटँकर विकत घ्यावे लागत असल्याने उद्योजकांना पाण्याचे मूल्य कळले आहे. पाणीटंचाईची भीषणता भविष्यात अशी येऊ नये म्हणून, उपाययोजना करण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देणे सुरू झाले आहे. त्यामुळे अमरावती विभागातील सर्व औद्योगिक क्षेत्रात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे.पाणीटंचाईतून मार्ग काढण्यासाठी आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी अकोला एमआयडीसी प्रशासनाने अकोल्यातील प्रत्येक उद्योजकांस वृक्ष लागवडीचे उद्देश दिले आहे. त्यास चांगला प्रतिसादही मिळत असून, २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्देश समोर ठेवले आहे. यातील किमान १५ हजार वृक्ष तरी लावले जातील, असा अंदाज जाणकारांकडून वर्तविला जातो आहे.
अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनचे पदाधिकारी आणि उद्योजक यांच्या मदतीने एमआयडीसी परिसरात २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्देश घेतले आहेत. जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा आमचा संकल्प आहे.-राहुल बन्सोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी, अकोला.