अकोला: काेराेना काळात जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणाऱ्या सुमारे २५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने दुसरी लाट ओसरताच कामावरून कमी केले आहे. त्यामुळे अनेकांचा राेजगार गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गरज सराे अन् वैद्य मराे अशी प्रशासनाची भूमिका असल्याचा आराेप कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला आहे.जिल्ह्यात काेराेनाच्या पहिल्या लाटेत जीवाची पर्वा न करता काेराेना रुग्णांची सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले. त्यानंतर दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. आता दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे सुमारे २५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या आराेग्य विभागाच्या भरतीत काेराेना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याची मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
तिसरी लाट आली तर...
राज्यभरात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत असल्याने काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा धाेका कायम आहे़
तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा भयंकर राहणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे़ त्यामुळे, पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे़
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धाेका पाहता प्रशासनाने आतापासूनच तयारी करण्याची गरज आहे. तसेच नागरिकांनीही नियमांचे पालन कण्याची गरज आहे.
कोविड केअर सेंटरही बंद
काेराेनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान जिल्ह्यात एकूण ७ काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. या व्यतिरिक्त ग्रामीण रुग्णालय, सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, आयुर्वेद महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी डाॅक्टर्स, परिचारीका, वाॅर्डबाॅय व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. जुलै महिन्याच्या अखेरीस कोविडची दुसरी लाट ओसरली. त्यामुळे काेविड केअर सेंटर ओस पडली आहेत. परिणामी जिल्ह्यातील काेविड सेंटर बंद करण्यात आले आहेत. तसेच या काेविड सेंटरवर कार्यरत कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.