लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खोलेश्वर परिसरातील सरकारी बगिचाजवळ दोन वर्षांपूर्वी झालेल्या लुटमारीच्या घटनेतील १५ लाख रुपयांपैकी अडीच लाख रुपये आरोपींकडून जप्त केले. गुन्ह्यातील पाचही आरोपींना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने अकोट रोडवर दरोडा घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांच्या टोळीला साहित्यासह अटक केली होती. या टोळीतील आरोपी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अंकुश अरुण केवतकर (२३ रा. जुने शहर), राजेश साहेबराव चव्हाण (३२ रा. जुने शहर), रितेश लिंबादास मृर्दुगे(३२ रा. वाशिम बायपास), राकेश दिलीप वाडेकर (३२ रा. जुने शहर), नवीन प्रल्हाद पाली (२४ रा. जुने शहर) आणि रितेश लिंबादास मुर्दुगे(३२ रा. वाशिम बायपास) यांना अटक केली होती. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी २०१५ मध्ये खोलेश्वर परिसरातून जाणाऱ्या एका व्यापाऱ्याकडून १५ लाख रुपयांची रक्कम लुटली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना या लुटमार प्रकरणात पुन्हा अटक केली आणि त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने पाचही आरोपींना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
लुटमारीतील २.५० लाख जप्त; पोलीस कोठडीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:19 AM