अकोला: शहरात कचरा उचलणाºया ट्रॅक्टरच्या संदर्भात माहिती उपलब्ध न करून दिल्याप्रकरणी राज्य माहिती आयुक्तांनी मनपाचे जनमाहिती अधिकारी टी. पी. मुदगल, प्रशांत राजुरकर यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला, तसेच मनपाच्या तत्कालीन दोन उपायुक्तांविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश दिले.अल्पसंख्याक कल्याण समितीचे अशासकीय सदस्य नौशाद खान समद खान यांनी माहितीच्या अधिकारात मनपाच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडे शहरात कचरा जमा करणाºया ट्रॅक्टरबाबत माहिती मागितली होती. अर्जदाराला ३० दिवसांच्या आत माहिती उपलब्ध न झाल्यामुळे नौशाद खान यांनी प्रथम अपिलीय अधिकारी तथा तत्कालीन उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले. गुल्हाने यांच्याकडून माहिती उपलब्ध न झाल्याने अर्जदार खान यांनी राज्य माहिती आयुक्त, अमरावती यांच्याकडे याचिका दाखल केली. याप्रकरणी सुनावणीअंती आरोग्य स्वच्छता विभागातील जनमाहिती अधिकारी टी.पी. मुदगल, प्रशांत राजुरकर यांना प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला, तसेच तत्कालीन उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने, समाधान सोळंके यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश दिले.