- अतुल जयस्वाल
अकोला : गावातील ऐक्य अबाधित राहून, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना सुरू आहे. यंदा जिल्ह्यातील २६७ गावांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेचा स्वीकार करीत आपल्या गावांमध्ये एक गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे.
सण-उत्सवांदरम्यान सामाजिक सलोखा राहून गावातील ऐक्य कायम राहावे, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. एकापेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये चढाओढ निर्माण होऊन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पोलीस प्रशासनाकडून ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येते. यंदा जिल्ह्यात एकूण १३३५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची नोंदणी झाली आहे. अकोला शहरासह तालुक्याच्या शहरांमध्ये ५४८, तर ग्रामीण भागात ७८७ गावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. यांपैकी २६७ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना झाली आहे. कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवावर नियम व अटींचे बंधन आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये एक गणपतीची स्थापना झाली आहे. विविध परवानग्या, कोरोना प्रतिबंधात्मक नियम असतानाही भाविकांचा उत्साह कायम आहे. सर्व नियम व अटींचे पालन करून बाप्पांचा उत्सव साजरा करण्याचा निर्धार गणेशोत्सव मंडळांनी केला आहे.
बाप्पाच्या घरगुती प्रतिष्ठापनेवर भर
गतवर्षीप्रमाणे या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गणेशोत्सवादरम्यान गर्दी होऊ नये म्हणून शासनाकडून नियम घालून देण्यात आले आहेत. त्यामुळे गतवर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या कमी झाली आहे. घरांमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यावर भर आहे. त्यामुळे घरोघरी श्री विराजमान झाल्याचे चित्र आहे.