अकोला: यावर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत प्राप्त झालेला २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांचा निधी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे. तहसील कार्यालयांकडून मदतीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात ६८ हजार ५७१ शेतकऱ्यांचे ५१ हजार ५६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, २६६ हेक्टर शेतजमिनीचे क्षेत्र खरबडून गेल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांचा निधी ९ नोव्हेंबर राेजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. उपलब्ध मदत निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार १० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला. तहसील कार्यालयांकडून मदतीची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.
तालुकानिहाय वितरित अशी आहे मदतीची रक्कम!
जिल्ह्यातील सातही तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २६ कोटी ७८ लाख ७३ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली. त्यामध्ये अकोला तालुका ५ कोटी ६६ लाख ३ हजार रुपये, बार्शीटाकळी तालुका १ कोटी ४२ लाख ९५ हजार रुपये, अकोट तालुका ५ कोटी १८ लाख २२ हजार रुपये, तेल्हारा तालुका ३ कोटी १८ लाख ७ हजार रुपये, बाळापूर तालुका ७ कोटी २७ लाख ७८ हजार रुपये, पातूर तालुका १ कोटी ६२ लाख २७ हजार रुपये व मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी २ कोटी ४३ लाख ४१ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.