अकोला, दि. ८- इयत्ता बारावीच्या रसायनशास्त्र व इतिहास विषयाच्या पेपरला शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने परीक्षा केंद्रांवर घातलेल्या धाडीत एकूण २७ विद्यार्थ्यांना कॉपी केल्याप्रकरणी निलंबित केले. जिल्हय़ातील ६७ परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षेदरम्यान अनेक केंद्रांवर कॉपी प्रकाराला ऊत आला असून, कॉपीमुक्त अभियान अयशस्वी होत आहे. बुधवारी बारावीचे रसायनशास्त्र आणि इतिहास विषयाचे पेपर होते. पातूर येथील एच. एन, सिन्हा कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर माध्यमिक उपशिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांच्या भरारी पथकाने धाड घातली असता, या ठिकाणी २४ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. पथकाने या सर्व विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली. मूर्तिजापूर तालुक्यातील दहातोंडा येथील सुनील राठोड कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर इतिहासाचा पेपर सुरू असताना, ३ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांच्या भरारी पथकाने तीनही विद्यार्थ्यांना निलंबित केले.
२७ कॉपीबहाद्दरांवर परीक्षेदरम्यान कारवाई
By admin | Published: March 09, 2017 3:34 AM