लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : काही दिवसांपूर्वी परीक्षेविना प्रथमच दहावी व बारावीचा निकाल लागला. कोरोनामुळे बोर्डाने सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले. त्यामुळे यंदा निकालही ९८ टक्क्यांवर लागला आहे. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरमसाठ झाली असल्याने, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडे (आयटीआय) विद्यार्थ्यांचा कल प्रचंड वाढलेला दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात आयटीआयच्या २,७९६ जागा आहेत, परंतु त्यासाठी ८ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आता प्रवेशासाठी चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. एकेकाळी आयटीआयचे महत्त्व कमी झाले होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्था ओस पडल्या होत्या. परंतु, अलीकडच्या तीन-चार वर्षांमध्ये आयटीआयला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसारख्या मेट्रो सिटीमध्ये औद्योगिक क्षेत्रात आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आता या औद्योगिक शिक्षणाकडे कल वाढत चालला आहे. आयटीआयची ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात आयटीआयच्या शासकीय ८ आणि खासगी २ संस्था आहेत. या १० संस्थांमध्ये एकूण २,७९६ जागा आहेत. या जागांसाठी जिल्हाभरातून ८ हजार २७३ अर्ज केले आहेत. जागा कमी अन् उमेदवार जास्त झाल्यामुळे आयटीआय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चढाओढ होत आहे.
विद्यार्थ्यांनी केलेले प्रवेश अर्ज असे
अकोला - २,६२९
अकोट - १,१९७
बाळापूर - ९८५
बार्शीटाकळी - ७१४
मूर्तिजापूर - १,११३
पातूर - ६७४
तेल्हारा - ९६१
एकूण जागा - २,७९६
एकूण अर्ज - ८,२७३
शासकीय संस्था - ८ - २६१६
खासगी संस्था - २ - १८०
आयटीआयमध्ये असलेले रोजगाराभिमुख अभ्यासक्रम पाहता, विद्यार्थी व विद्यार्थिनींचा आयटीआयकडे कल वाढत आहे. त्यामुळेच यंदा हजारो विद्यार्थ्यांनी आयटीआयटी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. गुणवत्तेनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी व्यवसाय, नोकरीकडे वळू शकतो. त्यामुळेच आयटीआयला पसंती मिळत आहे.
- आर. टी. मुळे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची)