सुनील काकडे/वाशिम: वर्हाडातील तीन जिल्ह्यांसाठी महावितरणने हाती घेतलेल्या इन्फ्रा-२ योजनेअंतर्गत तब्बल २७१ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत; मात्र विविध अडचणींमुळे ही योजना थंडबस्त्यात अडकल्याने याअंतर्गत सुरु असलेली अथवा होणारी कामे खोळंबली आहेत. गंभीर बाब म्हणजे, नादुरुस्त रोहित्रांमुळे शेतीचे वाटोळे झाले असताना २१0७ पैकी केवळ १७७ नविन रोहित्र बसविण्याचे कामं मार्गी लागली आहेत. या-ना-त्या कारणांमुळे नेहमीच टिकेचे लक्ष्य ठरलेल्या विद्यूत वितरण कंपनीचा कारभार गेल्या काही वर्षांपासून ढेपाळला आहे. घरगुती ग्राहकांसोबतच कृषीपंप आणि व्यावसायिक ग्राहकांना सुरळीत वीज पुरविण्याकामी महावितरण सपशेल अपयशी ठरत असल्याचीही ओरड सर्वच स्तरातून होत आहे. सद्यस्थितीत एकट्या वाशिम जिल्ह्यात २00 पेक्षा अधिक ट्रान्सफार्मर (विद्यूत रोहित्र) जळून नादुरुस्त झालेले आहेत. अनेक ठिकाणच्या विद्युत वाहिन्या जीर्ण झाल्याने सोसाट्याचा वारा अथवा वादळाच्या प्रसंगी त्या जमिनदोस्त होतात. याशिवाय जुन्या पद्धतीच्या सिमेंट पोलवरुन अनेक गावांना वीज पुरवठा केला जातो. हे खांबदेखील धोकादायक अवस्थेत उभे आहेत. या सर्व गंभीर बाबींमुळे जनजीवन धोक्यात सापडले आहे. वाशिम जिल्ह्यातील किन्हीराजा वीज उपकेंद्रांतर्गत येणार्या ४0 गावांमधील सिंगल फेज योजना पुरती कोलमडली असून थ्री फेज योजनेतील ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाल्याने गावेच्या गावे अंधारात राहण्यासोबतच शेतीलाही पुरेशी वीज मिळणे दुरापास्त झाले आहे. दरम्यान, वर्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये नविन वीज उपकेंद्र उभारणे, अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर टाकणे, पॉवर ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविणे, नविन वीज रोहित्र बसविणे, रोहित्रांची क्षमता वाढविणे, उच्चदाब आणि लघूदाब विद्युत वाहिन्या टाकणे आदी कामांसाठी महावितरणच्या वरिष्ठ प्रशासनाकडून मंजूरात मिळालेली आहे. यासाठी २७१ कोटी रुपयांचा निधी खर्ची घातला जात आहे; मात्र फेब्रूवारी २0१५ पासून सुरु झालेल्या या योजनेचे काम सुरुवातीपासून थंडबस्त्यात अडकले आहे.
*कामांची गती मंदावली!
या योजनेअंतर्गत तीन जिल्ह्यांमध्ये २१0७ नवीन वीज रोहित्र बसविण्याचे काम प्रस्तावित आहे; मात्र सद्यस्थितीत केवळ १७७ रोहित्र बसविले गेले आहेत. ३३६ रोहित्र बसविण्याचे काम सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासह २७ नवीन वीज उपकेंद्र उभारले जाणार आहेत. त्यापैकी केवळ १२ उपकेंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे, तर १५ नविन उपकेंद्र उभारण्याच्या कामाचा श्रीगणेशादेखील झालेला नाही. अतिरिक्त पॉवर ट्रान्सफार्मर टाकण्याच्या २१ कामांपैकी ७ कामे पूर्ण झाली; तर ८ कामे प्रगतीपथावर असून ६ कामे कधी सुरु होतील, याची शाश्वती नाही. रोहित्रांची क्षमता वाढविण्याच्या ५0७ कामांपैकी आजरोजी केवळ ६६ कामे मार्गी लागली आहेत. इन्फ्रा-२ मध्ये १४८७ किलोमिटर अंतराची उच्चदाब वाहिनी टाकली जाणार आहे; मात्र सध्या केवळ ५0 किलोमिटर अंतराची उच्चदाब वाहिनी टाकली गेली आहे. ३0२४ किलोमिटर अंतरावर लघूदाब वाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित असून, सद्यस्थितीत ११0 किलोमिटरचे काम पूर्ण झाले आहे. १८८ किलोमिटर लघूदाब वाहिनी टाकण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.