संतोष येलकर
अकोला : कोरोनाकाळात जुलै अखेरपर्यंत प्रेरणा प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये जिल्ह्यात २७२ शेतकरी मानसिक तणावग्रस्त आढळून आले. तणावग्रस्त शेतकऱ्यांवर उपचारासह त्यांचे समुपदेशन करण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी बाह्यरुग्ण तपासणी, समुपदेशन सत्रे, शेेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे समुपदेशन आदी कार्यक्रम राबविण्यात येतात. गत मार्च २०२० ते जुलै २०२१ अखेरपर्यंतच्या कोरोनाकाळात प्रेरणा प्रकल्प अंतर्गत सर्वोपचार रुग्णालयासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या बाह्यरुग्ण तपासण्यांमध्ये २७२ शेतकरी मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त असल्याचे आढळून आले. तणावग्रस्त आढळलेल्या शेतकऱ्यांवर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या प्रेरणा प्रकल्पांतर्गत औषधोपचार आणि मानसोपचार तज्ज्ञांमार्फत संबंधित तणावग्रस्त शेतकऱ्यांचे समुदेशन करण्यात आले.
शेतकऱ्यांमध्ये तणावाची
अशी आढळली कारणे!
कोरोनाकाळात जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात २७२ शेतकरी तणावग्रस्त आढळून आले. त्यामध्ये आर्थिक अडचण, नापिकी व कर्जबाजारीपणा, कौटुंबिक समस्या, झालेले नुकसान इत्यादी कारणांमुळे शेतकरी तणावग्रस्त असल्याचे आढळून आले.
तणावांच्या कारणांवर
केले समुपदेशन !
मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त आढळलेल्या शेतकऱ्यांच्या तणावाची कारणे, समस्या समजून घेतल्यानंतर समस्यांवर उपाय तसेच नकारात्मकतेची भावना कमी करून सकारात्मक विचार करण्यासाठी प्रेरणा प्रकल्पाच्या मानसोपचार तज्ज्ञांमार्फत संबंधित तणावग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले.
शेतकरी आत्महत्याग्रस्त
१२१ कुटुंबांचे गृहभेटीद्वारे समुपदेशन!
कोरोनाकाळात जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १३७ शेतकरी कुटुंबांपैकी १२१ कुटुंबांच्या घरी भेटी देऊन शेतकरी आत्महत्याग्रस्त संबंधित कुटुंबातील व्यक्तींचे समुपदेशन करण्यात आले तसेच आवश्यक ते औषधोपचार देण्यात आले.
कोरोनाकाळात जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात २७२ शेतकरी मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त असल्याचे आढळून आले. तणावग्रस्त आढळलेल्या संबंधित शेतकऱ्यांचे प्रेरणा प्रकल्पांतर्गत मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशन करण्यात आले. तसेच आवश्यक ते औषधोपचार करण्यात आले. यासोबतच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तींचेही गृहभेटीद्वारे समुदपदेशन करण्यात आले.
डाॅ. हर्षल चांडक
मानसोपचार तज्ज्ञ तथा कार्यक्रम अधिकारी, प्रेरणा प्रकल्प, अकोला.