अकोला: संततधार पावसामुळे शहराच्या विविध भागात पाणी साचले असून नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. अतवृष्टी लक्षात घेता, शिकस्त इमारतींना धोका निर्माण झाला आहे. या पृष्ठभूमिवर खबरदारीचा उपाय म्हणून मनपा प्रशासनाने शहरातील २९९ शिकस्त इमारतींना नोटीस बजावत त्या खाली करण्याचे निर्देश मालमत्ताधारकांना दिले आहेत. मागील तीन दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे शहरातील सखल भागात मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले असून, जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे जीर्ण झालेल्या शिकस्त इमारती कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईत शिकस्त इमारती कोसळून त्यामध्ये रहिवाशांचे जीव गेल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या. त्या पृष्ठभूमीवर मनपाच्या नगर रचना विभागाने शहरातील शिकस्त इमारतींचा लेखाजोखा तयार केला. चारही क्षेत्रीय अधिकार्यांनी झोननिहाय २९९ शिकस्त इमारतींना नोटीस बजावल्या. इमारती खाली करण्याची सूचना मालमत्ताधारकांना देण्यात आली आहे. शिकस्त इमारती कोसळून कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील अशा इमारतींबाबत महापालिका प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे.
महापालिका क्षेत्रात २९९ शिकस्त इमारती
By admin | Published: August 06, 2015 1:17 AM