लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महावितरणच्या सेवा ऑनलाइन मिळविण्यासाठी मोबाइल क्रमांकांची नोंदणी करणे गरजेचे असून, अकोला परिमंडळातील अकोला मंडळामध्ये २ लाख ६६ हजार १५९, तर वाशिम मंडळामध्ये १ लाख ३0 हजार ७६४ ग्राहकांनी अशाप्रकारे या दोन जिल्ह्यांतील एकूण ३ लाख ९६ हजार ९२३ ग्राहकांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे.महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदविलेल्या वीज ग्राहकांना सोयीनुसार व निवडीनुसार इंग्रजी व मराठी भाषेतही एसएमएस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांचे वीज बिल तयार हो ताच, तत्काळ संबंधित ग्राहकाच्या मोबाइलवर एकूण वीज बिलाची रक्कम, देय तारीख याची माहिती मिळत आहे. मोबाइलवर प्राप्त सदर एसएमएस दाखवून वीज बिल भरण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मीटरचे रिडिंग घेतल्यानंतर दिनांक व घेतलेले मीटर रिडिंग अशा प्रकारची माहिती वीज ग्राहकांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर खंडित वीज पुरवठा, भारनियमन, संबंधित वीज पुरवठा बंद व सुरू होण्याची वेळ याची माहि तीदेखील एसएमएसच्या माध्यमातून तातडीने मिळणार आहे. ग्राहकाच्या मीटरचे रिडिंग उपलब्ध न झाल्यास त्याला याचा एसएमएस प्राप्त होणार असून, त्यानंतर ग्राहक दिलेल्या कालावधीत मोबाइल अँपद्वारे मीटरचे रिडिंग महावितरणला थेट पाठवू शकणार आहे, त्यामुळे ग्राहकाला योग्य देयक मिळणार असून, तत्काळ ऑनलाइन भरणा करता येणार आहे. मोबाइल क्रमांक नोंदविलेल्या ग्राहकांना कुठल्याही तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यानंतर वैयक्तिक व इतर माहिती नोंद असल्यामुळे फक्त तक्रार सांगावी लागणार आहे, त्यामुळे वेळेची बचतसुद्धा होणार असून, तत्पर सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
ग्राहकाभिमुख सेवा प्रदान करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील असून, अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहक हिताचे अनेक उपक्रम राबवत आहे. या सर्व सेवा व सुविधा प्राप्त होण्यासाठी वीज ग्राहकांनी मोबाइल क्रमांक नोंदवावा, तसेच मोबाइल अँपच्या सुविधेचा लाभ घ्यावा. - अरविंद भादीकर, मुख्य अभियंता, महावितरण, अकोला परिमंडळ.