मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलजवळ दुचाकीवरून चारचाकी वाहनात काही व्यक्ती गांजा ठेवत असताना ग्रामीण पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी आरोपीला अटक करून ३० किलो गांजा जप्त केला. ही कारवाई २७ जुलै रोजी करण्यात आली.
रात्रीच्या वेळी ग्रामीण पोलीस हे राष्ट्रीय महामार्गाने ग्रामीण हद्दीत गस्तीवर असताना एका हॉटेलजवळ काही व्यक्ती दुचाकीवर असलेल्या वस्तू चारचाकी वाहनात ठेवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांची गाडी घटनास्थळी जाताच दुचाकीवर असलेल्या दोन व्यक्तींनी धूम ठोकली. त्याचबरोबर चारचाकी वाहन क्रमांक एम. एच. १२, डीएम ५१२ सह आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला खड्ड्यांत उतरली. तरी आरोपीने ती वर काढण्याचा प्रयत्न केला, गाडी निघत नसल्याचे पाहून आरोपी फैजान खान लतीफ खान (२२) रा. मोमीन पुरा ताजनापेठ अकोला हा रात्रीच्या अंधारात झुडपात लपून बसला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गाडीत गांजा असल्याचे सांगितले. तेव्हा त्याच्याकडे पॅकिंग केलेला ३ लाख ५६५ रुपयांचा ३० किलो गांजा आढळून आला. त्याचबरोबर चारचाकी वाहन किंमत २ लाख ५० हजार असा ५ लाख ५० हजार ५६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद, पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर, हेड कॉन्स्टेबल विजय मानकर, सुदाम धुळगुडे यांनी केली. कारवाई शहर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने ग्रामीण पोलिसांनी प्रकरण शहर पोलिसांकडे वर्ग केले आहे.