अकोला : कोरोनापाठोपाठ आता म्युकरमायकोसिसचाही धोका वाढला असून, म्युकरमायकोसिसचे नवे रुग्ण समोर येत आहेत. या रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून, आतापर्यंत ३० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या रुग्णांवर अकोल्यात उपचार शक्य नाही, अशा रुग्णांना पुढील उपचारासाठी नागपूरला संदर्भीत केले जात असल्याची माहिती सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. कोविड उपचारादरम्यान किंवा उपचारानंतर अनेकांना बुरशीजन्य असलेल्या म्युकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीच्या आजाराची लागण झाल्याचे समोर येत आहे. सर्वोपचार रुग्णालयात असे रुग्ण दररोज दाखल होत आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ७३ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यापैकी पाच शस्त्रक्रिया शनिवार, २९ मे रोजी सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. बुलडाणा, वाशिमसह शेजारील जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचे रुग्णदेखील उपचारासाठी अकोल्यात दाखल होत आहेत. ज्या रुग्णांवर अकोल्यात उपचार शक्य नाही, अशा रुग्णांना नागपूरला संदर्भीत केले जात आहे.
४६ रुग्णांवर उपचार सुरू
सर्वोपचार रुग्णालयात सद्यस्थितीत म्युकरमायकोसिसच्या ४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील काही रुग्णांची स्थिती गंभीर असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, तर काही रुग्णांना केवळ औषधोपचार सुरू असल्याची माहिती आहे.
अशी आहे स्थिती
वैद्यकीय तपासणी - ७३
शस्त्रक्रिया - ३०
डिस्चार्ज - १४
नागपूर संदर्भीत - १२
सायनस आणि दातांच्या शस्त्रक्रिया
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने सायनस आणि दातांमध्ये समस्या उद्भवत असल्याचे आढळून आले. या दोन्ही भागांवरील बुरशीचा फैलाव होऊ नये, यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
सर्वोपचार रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत ३० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ज्या रुग्णांवर अकोल्यात उपचार शक्य नाही, अशांना नागपूर येथे संदर्भीत केले जात आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळताच रुग्णांनी पोस्ट कोविड ओपीडीला भेट द्यावी.
- डॉ. दिनेश नैताम, वैद्यकीय उपअधीक्षक, जीएमसी, अकोला