अकोला: अकोल्याच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी खासगी जमीन संपादनासह इतर कामांकरिता ३०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी दिली. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी तीन टप्प्यात प्राप्त झालेली मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असून, उर्वरित चवथ्या टप्प्यातील मदतीचा निधी प्राप्त करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाई निवारणासाठी राबविण्यात येणाºया उपाययोजनांच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. अकोल्यातील शिवणी विमानतळ केंद्र शासनांतर्गत भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या मालकीचे असून, विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १ हजार ८०० मीटरपर्यंत वाढविणे प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने विमानतळ विस्तारीकरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ६०.६८ हेक्टर आर जमिनीचा ताबा भारतीय विमान पत्तन प्राधिकरणला देण्यात आला आहे; मात्र २१ हेक्टर खासगी जमीन संपादन करणे बाकी आहे. त्यानुषंगाने खासगी जमीन संपादनासह अनुषंगिक इतर कामांसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे करण्यात आल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यातील शेतकºयांसाठी राज्य शासनामार्फत तीन टप्प्यात प्राप्त झालेली १३७ कोटी रुपयांची मदत शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित चवथ्या टप्प्यातील मदत तसेच अकोट व पातूर या दोन तालुक्यातील शेतकºयांसाठी दुष्काळी मदत उपलब्ध करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. अकोल्यातील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे पुढील महिन्यात लोकार्पण होणार असून, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आकृतीबंद लवकरच तयार करण्यात येणार आहे. शहरात पोलीस वसाहतीची शंभर कोटींची कामे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.कावड मार्गाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश!अकोला-अकोट या रस्त्याचे काम सुरू असून, अकोला ते गांधीग्राम या कावड मार्गाचे एका बाजूने दोन महिन्यात काम पूर्ण करून कावड यात्रेकरूंसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.