अकोला येथील एमआयडीसीला पाणी पुरवठा करण्यासाठी विझोरा येथून गोरव्हा, बार्शीटाकळी रस्त्याने महानच्या काटेपुर्णा प्रकल्पापर्यंत पाईपलाईनसाठी खोदकाम जेसीबी यंत्राद्वारे सुरू आहे. सदर काम गोरव्हा गावापर्यंत गेले असतानाच, संबंधित कंत्राटदाराने विझोरा-गोरव्हा दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली तीनशेहून अधिक झाडे नष्ट केली. या संदर्भात कुठल्याही प्रकारची परवानगी कंत्राटदाराने घेतली नाही. सामाजिक वनीकरण विभागाने गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी या मार्गावर दुतर्फा वृक्ष लागवड केली होती. त्यांचे जतन व संवर्धन केले होते. याकरीता लाखो रुपये खर्च केला असताना, ठेकेदारासह अभियंता यांनी बेजबाबदारपणाचा कळस गाठून, कोवळे वृक्ष संपूर्णतः नष्ट करून पर्यावरणानाला हानी पोहोचवली आहे. या संदर्भात गोरव्हाचे सरपंच राजेश खांबलकर यांनी सामाजिक वनीकरण विभागाकडे तक्रार करून संबंधित कंत्राटदार, अभियंत्याविरूद्ध तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
फोटो:
तक्रार करताच कंत्राटदाराने काढला पळ!
शेकडो झाडे नष्ट केल्याची तक्रार करण्यात आल्याचे समजताच, कंत्राटदाराने मजूर व यंत्रासह येथून पळ काढला आहे.
कंत्राटदाराविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे.
शासनच म्हणते, झाडे लावा, झाडे जगवा. परंतु तीनशेहून अधिक कोवळी झाडे नष्ट करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी खांबलकर यांनी केली.