अकोला, दि. 14 - नाथ संप्रदायातील संत एकनाथ महाराज गोसावी यांचे वंशज पैठणहून अकोल्याला आले होते. त्यावेळी शहरात त्यांनी मुरलीधराच्या मंदिराची स्थापना केली होती. सुमारे ३०० वर्षांपूर्वी शहरातील जयहिंद चौक परिसरात मुरलीधराचे मंदिर स्थापन करण्यात आले. एकनाथ महाराजांचे वंशज भानुदास महाराज, चक्रपाणी महाराज यांच्या वंशातील सुपुत्र वेदशास्त्री पंडित बाबाशास्त्री ऊर्फ राघवशास्त्री रामकृष्ण घोंगे यांनी मुरलीधर मंदिराची स्थापना 300 वर्षांपूर्वी केली. मंदिर १०४ चौरस फूट जागेत आहे. संगमरवरी दगडात मुरलीधर, भगवान श्रीकृष्ण व माता राधा यांची अनुपम मूर्ती १५ व्या शतकातील आहे.
मंदिरात श्रीकृष्ण जयंती महोत्सव साजरा करण्यात येतो. बाळकृष्णाचा पाळणा हा आठ फूट उंच असून, १५० वर्षांपूर्वीचा आहे. जयपूरच्या कारागीरांनी त्या काळात हा पाळणा बनविला होता. भागवताचार्य दामोदर ऊर्फ नानाशास्त्री महाराज यांचे ७६ वर्षीय सुपुत्र प्रभाकर महाराज घोंगे सद्यस्थितीत मुरलीधराची सेवा करीत आहे. दरम्यान, गोपाळकालानिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी येथे याठिकाणी होते.